गडचिरोली : अंगणवाड्यांच्या महिलांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तोपर्यंत किमान वेतन २६ हजार रुपये द्या, दिलेल्या आश्वासनानुसार अंगणवाडीच्या महिलांना मानधनाचे निम्मे पेन्शन तथा ग्रॅज्युटी द्या, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी हजारावर महिलांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. यावेळी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने ८ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या महिलाही सहभागी होत आहेत.
यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा.रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, जनतेने निवडून दिलेल्या आमदार-खासदारांच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. तर हेच आमदार जनतेच्या भविष्याचा विचार का करीत नाहीत. केवळ आश्वासन देतात, परंतु त्याची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा ग्रॅज्युटी देण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत देण्यात आले. पण आठ महिन्यांचा कार्यकाळ लोटला, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अमोल मारकवार म्हणाले, कामगाराला संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. म्हणूनच गरीब दिवसेंदिवस गरीब होताना पहावयास मिळते. गोरगरीब जनतेवरील अन्याय आणि सरकारची दडपशाही वाढत आहे. या दडपशाहीचा संघटीतरीत्या आपण प्रतिकार केला पाहीजे असे ते म्हणाले.
यावेळी प्रमोद गोडघाटे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. उज्वला उंदीरवाडे यांनी आभारप्रदर्शन केले. हे धरणे यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बेंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बावणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगांता मुनघाटे यांनी विशेष परीश्रम घेतले.