ज्ञान व कौशल्य प्रदर्शनातून झळकली प्लॅटिनमच्या विद्यार्थ्यांची कलात्मक क्षमता

विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे आकलन

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलमध्ये ज्ञान व कौशल्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांसह गणित, विज्ञान, सामाजिक शास्र तथा कला आणि हस्तकला या विषयांवरील या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे आकलन व कलात्मक क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले.

या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर आणि भावपूर्ण रेखाचित्रांच्या आकर्षक मांडणीने पाहुण्यांचे आणि पालकवर्गाचे स्वागत करण्यात आले. या कलात्मकतेची झलक पाहून पालकवर्गाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळा समितीच्या संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र झाले होते. सामुहिकपणे राबविलेल्या उपक्रमातून कोणतेही काम किती चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकते याचा प्रत्यय या प्रदर्शनाने दिला. मुख्याध्यापिका अनायता चार्ल्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी यासाठी मेहनत घेतली.