राज्यव्यापी संपाअंतर्गत अंगणवाडी महिलांचा सीटूच्या नेतृत्वात अहेरीत मोर्चा व सभा

अंगणवाड्यांना टाळे लावून आंदोलन

अहेरी : किमान वेतन, ग्रॅज्युटी व पेन्शन मिळविण्यासाठी अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्यांनी सीटूच्या नेतृत्वात राज्यव्यापी संप पुकारलेला. या संपाअंतर्गत अंगणवाड्यांना टाळे लावून महिला कर्मचारी रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी झाल्या. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सर्व प्रकल्पांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी अहेरी तहसील कार्यालयापासून रॅली काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी सरकारच्या विरोधात नारे देऊन निवेदन देण्यात आले. या मोर्चाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले.

या मोर्चाचे नेतृत्व रमेशचंद्र दहिवडे, राजेश पिंजरकर, किशोर जामदार, अमोल मारकवार, अरुण भेलके यांनी केले. या मोर्चात माया नवनुरवार, विठाबाई भट, छाया कागदेलवार, सुनंदा बावने, मोनी विश्वास, मुन्नी शेख, संगिता वडलाकोंडावार, वच्छला तलांडे , जयश्री शेरेकर, सुमन तोकलवार, मंगला दुग्गा, निर्मला नलगुडावार, कल्पना कुमरे यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.