कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शासन परिपत्रकाची केली होळी

गडचिरोली : आंदोलनाला 45 दिवस होऊनही कोणत्याही मागण्या पूर्ण न करता आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर कारवाई करणारे परिपत्रक काढल्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी त्या परिपत्रकाची एटापल्लीच्या महिला व बालविकास कार्यालयासमोर होळी करुन शासनाचा निषेध केला.

किमान 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे आणि इतर काही मागण्यांसाठी राज्यभरात अंगणवाडी महिला कर्मचारी 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे बालकांच्या पोषण आहारासह इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर कारवाई करून सरकार हिटलरशाहीने वागत असल्याचा आरोप माकपाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी केला.

यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अमोल मारकवार, छाया कागदेलवार, सुनंदा बावने, माया नौनुरवार, विठाबाई भट, मोनी बिस्वास, वच्छला तलांडे, बबिता मडावी, कविता मुरमुरे, मंगला दुगा, राजेश्वरी खोब्रागडे, संगिता बांबोळे, तारा वैरागडे, सुमन चालुरकर, प्रेमिला झाडे यांनी केले. तसेच एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या.