गडचिरोली : महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मंगळवारी गडचिरोलीत अभिनव लॅानजवळच्या मुख्य मार्गालगत निदर्शने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आगमनानिमित्त हे ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले.
किमान 26 हजार रुपये वेतन देण्यात यावे, गॅज्युटी देण्यात यावी, सर्वाना 5000 रुपये पेन्शन देण्यात यावे, या मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनात रमेशचंद्र दहिवडे, अमोल मारकवार, अरुण भेलके, डॉ.धर्मराव सोरदे, उज्वला उंदिरवाडे, कौशल्य गौरकार, सुशीला मंगरे, योगिता मुनघाटे, सुनंदा बावने, छाया कागदेलवार, अर्चना ढवळे, माधुरी चुनारकर, अर्चना रामटेके, राजश्रीताई लेखामी फकिराजी ढेंगणे, प्रेमिला झाडे इत्यादी सेविकांसह 845 महिला सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनात शेकापचे रामदास जराते, अक्षय कोसनकर, बीआरएसपीचे राज बन्सोड, आदिवासी युवा संघटनेचे कुणाल कोवे, रिपब्लिकन पक्षाचे उंदिरवाडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
अमोल मारकवार यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन मागण्या मान्य करण्याची विनंती केली.