आरमोरी : कुकडी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला मानसिक आणि शारीरिक शोषणामुळे आत्महत्या करावी लागल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी त्या मुलीचे शोषण करणाऱ्या प्रशांत भोयर (35 वर्ष) या नराधमावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरमोरीच्या पोलीस निरीक्षकांकडे केली. शिवाय त्या मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्यांवरही गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.
पीडित मुलीचे आई-वडील घरी नसताना आरोपीची पत्नी, आई व वहिनीने 4 ऑक्टोबर रोजी त्या मुलीच्या घरात घुसून तिला मारहाण केली आणि धमकीसुद्धा दिली. त्यामुळे त्या पीडित मुलीने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यामुळे ही आत्महत्या नसून एक प्रकारची हत्याच आहे, असा आरोप करत त्या मारहाण करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आदिवासीच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही समाजाच्या मुलीवर जर असा अन्याय होत असेल तर आझाद समाज पार्टी त्याविरोधात संघर्ष करत राहील, असे पक्षाचे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, जिल्हा सचिव दिनेश बनकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, आरमोरी तालूका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, युवा आघाडी प्रमुख शुभम पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे, शहराध्यक्ष नितीन भोवते, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार व पीडितेचे आई-वडील उपस्थित होते.