महिलांनो, उद्योग-व्यवसायासाठी पुढे या, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

अहेरीत महिला उद्योजकता महामेळावा

अहेरी : महिलावर्ग प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहेत. त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग, व्यवसायात पुढे येण्याची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकारचेही प्रयत्न आहेत. खास महिलांसाठी लहान-मोठे उद्योग आपल्या भागात स्थापित झाल्यास नक्कीच महिलांच्या विकासाचा स्तर उंचावेल, याकरिता गाव माझा फाऊंडेशनला जागेची उपलब्धता व सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी गाव माझा फाऊंडेशनच्या वतीने येथील वासवी हॅालमध्ये आयोजित महिला उद्योजकता महामेळाव्यात उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गाव माझा फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, गाव माझा फाउंडेशनच्या सहसंचालिका अष्टग्या वानखेडे, सरव्यवस्थापक जयवंत बहादुरे, कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयिका कांता बेडके, विभागीय व्यवस्थापक राजकपूर भेडके यांच्यासह भाग्यश्री मानके, लवकुमार शिंदे, शारदा शिंदे, भीमराव इंगळे, प्रीती इंगळे, किरण शेडमाके, सुनील उसेंडी, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, पुष्पा अलोने, लक्ष्मण येरावार, नागेश मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महिला स्वबळावर व स्वाभिमानाने जगाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून अहेरी उपविभागात उद्योग उभारण्यासाठी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गाव माझा फाऊंडेशनचे व्हिजन व मिशन असल्याचे फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पूर्वा दोंतुलवार यांनी तर आभार जयवंत बहादुरे यांनी मानले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.