जिल्ह्यातल्या ४६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण

प्रतिकुल परिस्थितीशी लढण्यास होणार सज्ज

गडचिरोली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४६४ शाळांमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे देण्यात येणार आहे. विपरित परिस्थितीत न डगमगता स्वत:चा बचाव कसा करायचा हे यात शिकवले जाणार आहे.

प्रतिकुल परिस्थितीचा सामना करताना मुलींनी संयम आणि कौशल्याचा वापर करून संकटाचा सामना करणे, त्यासाठी आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज झाली असल्याने अशा प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे तसेच शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सदर उपक्रमाचे औचित्य साधून गडचिरोलीच्या जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विवेक नाकाडे, तसेच जिल्हा शिक्षण विभागाचे कार्यक्रम समन्वयक वकील खेडकर, मुख्याध्यापक एस.एस.चंदगिरीवार, बी.वी. बेलखेडे, सचिन फुलझले, सी.आर.धारणे, एम.डी. वालको, सदर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक निनाद रामटेके, जिल्हा प्रशिक्षक समन्वयक योगेश चव्हान, तालुका समन्वयक रेमाजी मडावी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन योगेश चव्हाण यांनी तर सपना देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.