पाच दिवसीय कृषी महोत्सवात लाखोंची उलाढाल, शेतकरी-बचत गटांचा सहभाग

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अधिकाऱ्यांची भेट

गडचिरोली : गडचिरोलीत २३ ते २७ जानेवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या कंपन्या, बचत गटांसह लघुउद्योजकांनी लावलेल्या जवळपास २०० स्टॅालमधून जवळपास ५० लाखांची उलाढाल झाली. यात १५ लाखांच्या मालाची थेट विक्री, तर जवळपास ३५ लाखांच्या मालाची बुकिंग करण्यात आली. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह गडचिरोलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महोत्सवातील विविध स्टॅाल्सना भेट देऊन खरेदीही केली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जिल्हा कृषि महोत्सवासाठी २६ जानेवारीचा दिवस सर्वाधिक उत्साहवर्धक ठरला. ना.धर्मरावबाबा आत्राम अनेक स्टॅालला भेट देऊन शेतकरी, बचत गट, लघुउद्योजकांकडून त्यांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली.

यासोबत शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी संजय मीना, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, प्र.पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी कृषि महोत्सवातील विविध दालनांना भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प संचालक पंढरी डाखळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिके, माविमचे जिल्हा समन्वयक विष्णूपंत झाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आबासाहेच धापते, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना राऊत, जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल भोपये हे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत १० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपल्या पाककला प्रदर्शित केल्या. कृषि महोत्सवातील जैव प्रात्यक्षिके, दालने व कार्यशाळेस मोठ्या संखेने शेतकरी, महिला, विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी भेट दिली.

विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

या महोत्सवात शेतकऱ्यांना पशुधन विकास अधिकारी डॉ.नितीन दुधे यांनी रेबीज या आजाराविषयी माहिती देऊन तो कसा टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले. जिजामाता पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी प्रतिभा चौधरी यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अहेरी पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ.पवन पावडे यांनी मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, कुरखेडाचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रसाद भामरे यांनी मुक्तसंचार फॉवडी पालन याविषयी मार्गदर्शन केले. व्यावसायिक प्रशांत एरोगवार यांनी दुग्धव्यवसाय, दुग्ध संकलन, प्रक्रिया व विपणन याविषयी आपले अनुभव व्यक्त केले. अहेरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.यशवंत उमरदंड यांनी शेळीपालनाविषयी मार्गदर्शन केले.