गडचिरोलीच्या आशा सेविकेला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाचे निमंत्रण

आरोग्य विभागातील चांगल्या सेवेची दखल

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आशा सेविका उमा तिरुपती चालूरकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिल्लीतील लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या सोहळ्यासाठी चालूरकर दिल्लीत पोहोचल्या असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दि.14 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथे विज्ञान भवनात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध विभागातील उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 15 ऑगस्टच्या स्वातंत्र दिन सोहळ्यात सन्मान केला जातो. तसेच या सोहळ्यात त्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील दोन आशा आणि एका एएनएमला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील उमा चालूरकर यांचा समावेश असल्याचे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले. आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा सन्मान मिळाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.