अतिदुर्गम भागातील महिला शेतकरी करणार जिल्ह्याबाहेरील शेतीचा अभ्यास

यावर्षीची सहावी कृषीदर्शन सहल रवाना

गडचिरोली : जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करत असल्याने त्यांना शेतीतून तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यांनी जिल्ह्याबाहेरील आधुनिक शेती, वेगवेगळ्या पिक पद्धतीचा अभ्यास करावा यासाठी दुर्गम भागातील महिला शेतकऱ्यांची कृषीदर्शन सहल बुधवारी (दि.१) रवाना करण्यात आली. गडचिरोली पोलिसांची दादालोरा खिडकी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहल काढण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्रातील पेंढरी, कारवाफा, कटेझरी, ग्यारापत्ती, मुरुमगाव, कटेझरी, कोटगुल, कोरची, रेगडी, पुराडा पोलिस स्टेशनअंतर्गत शेतकरी, तसेच चातगाव, सावरगाव, गोडलवाही, गट्टा (फु.), बेडगाव, मालेवाडा व पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील 50 महिला शेतक­री या सहलीत सहभागी झाल्या आहेत. पोलिसांच्या पुढाकारने काढण्यात आलेली ही आतापर्यंतची दहावी, तर यावर्षीची (२०२३) सहावी कृषीदर्शन सहल आहे. यापूर्वी झालेल्या नऊ कृषीदर्शन सहल व अभ्यास दौऱ्यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून 410 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

कुठे कुठे देणार भेटी?

या सहलीदरम्यान सहभागी शेतकरी नागपूर, घातखेड, बडनेरा, अकोला, शेगाव, वरोरा येथील कृषी विज्ञान केंद्र, तसेच विविध शेती प्रक्षेत्रांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जीवनमान उंचावतील. त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे. १ ते ६ नोव्हेंबर असे ६ दिवस ही सहल राहणार आहे.

दहाव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौऱ्यासाठी महिला शेतकऱ्यांना रवाना करताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख व सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.