शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्राण्यांना ५५४ शेतकरी देणार ‘झटका’

सौर उर्जा कुंपणासाठी निवड, ७५ टक्के अनुदान

गडचिरोली : मोठ्या कष्टाने शेतात उगवलेल्या पिकांचे रक्षण झाले पाहिजे. सोबत वन्यजीवांचा जीव वाचून त्यांच्यापासून पिकांचे रक्षण झाले पाहिजे यासाठी महसूल व वनविभागाने डॅा.श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत वन्यप्राण्यांना ‘झटका’ देणारे सौर ऊर्जेवरील कुंपण दिले जाणार आहे. ७५ टक्के अनुदानावर दिल्या जाणारे हे कुंपण लावण्यासाठी गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील ५५४ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांपासून पीकांचे रक्षण करता येणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या २ किलोमीटरच्या सीमाक्षेत्रातील संवेदनशिल गावांमध्ये डॅा.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संवेदनशिल गावांमधील शेतकऱ्यांना सौर कुंपणाचा लाभ देण्यासाठी ७५ टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त १५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरून २० हजार रुपये किमतीचे सौर कुंपण लावता येणार आहे.

पुरवठादारांच्या पॅनलची होणार नियुक्ती

शेतकऱ्यांना हे सौर कुंपण लावून देण्यासाठी पुरवठादारांचे पॅलन तयार केले जाणार आहे. त्यासाठी वनविभागाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पॅनलवरील कोणत्याही पुरवठादाराकडून शेतकऱ्याला हे सौर कुंपण घेता येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या इतरही भागातील ज्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून जास्त नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे विभागीय वनअधिकारी नंदकिशोर राऊत यांनी सांगितले.