आणखी एका महिला नक्षल कमांडरने केले गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण

शासनाने जाहीर केले होते 8 लाखांचे इनाम

गडचिरोली : हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण करण्याच्या घटना वाढत असताना त्यात शनिवारी आणखी एकाची भर पडली. नक्षलींच्या गडचिरोली डीव्हीजनमध्ये टेलर टीमची कमांडर असलेल्या रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता (36 वर्ष) हिने सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलापुढे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

भामरागड तालुक्याच्या बोटनफुंडी या गावातील रहिवासी असलेली ललिता 2006 मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. तिने पुरवठा टीमची सदस्य म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शिवणकला, कापड कटींग आणि शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती टेलरिंग टिममध्ये दाखल होऊन 2014 मध्ये या टिमची कमांडर झाली. तिच्यावर नक्षलवाद्यांना विविध साहित्य पुरवठा करण्याची जबाबदारी होती.

ललिता हिने सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे 9 बटालियनचे कमांडंट शंभु कुमार मार्गदर्शनाखाली पार पाडली. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुक असतील त्यांना लोकशाही पद्धतीने सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

… म्हणून केले आत्मसमर्पण

ललिताने आत्मसमर्पण करण्यामागील कारणे पोलिसांकडे सांगितली. त्यात दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी चळवळीकरीता, जनतेकरीता पैसे गोळा करायला सांगून प्रत्यक्षात तो पैसा स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही. जेष्ठ लोक स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक देतात, दलममध्ये असताना विवाह झाला तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकीदरम्यान पुरुष नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला ठार मारल्या जातात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही, अशी कारणे ललिलाने सांगितली आहेत. सन 2022 ते 2024 या काळात आतापर्यंत 23 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.