आज गडचिरोली शहरातील 11 केंद्रांवर होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

6711 उमेदवार ठरले परीक्षेसाठी पात्र

गडचिरोली : पोलीस शिपाई पदाच्या 912 जागांसाठी मैदानी चाचण्यांमध्ये यशस्वी झालेल्या 6711 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यांची लेखी परीक्षा आज (रविवारी) गडचिरोलीमधील विविध 11 केंद्रांवर एकाचवेळी होणार आहे. यामध्ये सामान्य अध्ययन या विषयावरील पहिला पेपर सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान, तर दुसरा पेपर गोंडी व माडीया भाषा या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 यादरम्यान घेण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेसाठी सत्त असलेल्या गडचिरोली शहरातील केंद्रांमध्ये 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड (महिला महाविद्यालयाजवळ), 3) प्लॅटिनम ज्युबिली हायस्कुल, आरमोरी रोड 4) आदिवासी इंग्लिश मिडीयम स्कुल, सेमाना रोड 5) कार्मेल हायस्कुल, धानोरा रोड 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर्स, धानोरा रोड 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय, गोकुळनगर 8) शिवाजी इंग्लिश अॅकॅडमी स्कुल, गोकुळनगर 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटीआय चौक 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोली अशा एकुण 11 केंद्रांचा समावेश आहे. उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 8 वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांना प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https:// policerecruitment2024. mahait.org/ Forms /Home.aspx या वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घ्यावे. सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी पेन व पॅडही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कळविले.