गडचिरोली : घरी पाहुणी म्हणून आलेल्या 15 वर्षिय मावस पुतणीवर बलात्कार करणाऱ्या मावस काकाला गडचिरोलीचे अपर जिल्हा व सत्र न्यायाधिश उत्तम मुधोळकर यांनी सोमवारी 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबत 1 लाख 75 हजारांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही दंडाची रक्कम पीडित मुलीला दिली जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, या घटनेतीली पीडित मुलगी भामरागड येथे दसऱ्याच्या सणासाठी आपल्या मावशीकडे आली होती. 6 आॅक्टोबर 2019 रोजी आरोपीची शिक्षिका असलेली पत्नी शाळेत गेली असल्याची संधी साधून आणि छोटी मुले झोपी गेल्याचे पाहून आरोपीने हे कुकृत्य केले होते. त्यानंतर तिला मारून टाकण्याची धमकीही दिली होती. परंतू या घटनेची वाच्यता होताच पीडितेच्या आई-वडीलांनी तिला घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी आरोपीविरूद्ध कलम 376 (3), 506 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयान ग्राहय धरुन 20 वर्ष सश्रम कारावास आणि 1,75,000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम ही पिडीतेचे पुर्नवसन व वैद्यकीय उपचाराकरीता देण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर यांनी पूर्ण केला.