भाजप सरकारविरोधात एकवटलेल्या प्रागतिक पक्षांनी केली आघाडी

नेमकी कोणाची मते विभागणार?

गडचिरोली : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने ओबीसी, दलित, आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे जनविरोधी काम केल्याचा आरोप करीत अनेक छोट्या पक्षांनी प्रागतिक आघाडी केली आहे. आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ही आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. परंतू एनडीए विरूद्ध इंडिया यांच्यातील प्रमुख लढाईत या तिसऱ्या आघाडीमुळे कोणाची मते विभागली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रागतिक आघाडीत डावे, पुरोगामी, आंबेडकरवादी असे १३ राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ही आघाडी जोमाने काम करणार असल्याची माहिती शेकापचे रामदास जराते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष, भारतीय कॅाम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कॅाम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाइं (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे १३ घटक पक्ष प्रागतिक पक्ष महाराष्ट्र या आघाडीत सहभागी आहेत. स्थानिक स्तरावर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी युवा विकास परिषद, खदानविरोधी ग्रामसभा यांनाही या आघाडीत सहभागी करून घेण्यात आले असून भाजप सरकारविरोधात जनमत एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जराते यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला शेकापचे श्यामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्री वेळदा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव ॲड.जगदिश मेश्राम, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी, पुरोगामी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, तितिक्षा डोईजड प्रामुख्याने उपस्थित होते.