ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या स्वप्नांना ५५ बसेसमुळे मिळणार बळकटी

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील एसटी महामंडळात बसेसची कमतरता असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यासाठी मानव विकासच्या बसफेऱ्या कमी पडत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यात मानव विकास मिशनसाठी आणखी ५५ बसेस मिळणार आहेत. या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम काही महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळेदरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. परंतू यासाठी बसेस कमी पडत होत्या. त्यामुळे ५५ अतिरिक्त बसेसची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.

मानव विकास मिशनअंतर्गत राज्यातल्या २३ अतिमागास जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी ५ बसेस यानुसार राज्यातील १२५ तालुक्यांसाठी ६२५ बसेस चालविल्या जातात. बसेसचे आयुर्मान १० वर्ष किंवा ६.५० लक्ष किमी आहे. त्यानुसार अनेक बसेस कालबाह्य झाल्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी ५५ अतिरिक्त बसेसची गरज होती.

गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रतीबस अंदाजे ४० लक्ष याप्रमाणे एकूण ५५ अतिरिक्त बसेससाठी २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बसेसमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या स्वप्नांना निश्चितच बळकटी मिळणार आहे.