अधिकारी-कर्मचारी रमले खेळाच्या मैदानावर, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला संधी

शनिवारी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासह समारोप

गडचिरोली : गेल्या ७ फेब्रुवारीपासून गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी रमून गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील ९० टक्के टेबल-खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र पहायला मिळाले. शनिवारी अंतिम सामने होणार असून संध्याकाळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

जिल्हा परिषद परिसर या महोत्सवात पुरता न्हाऊन निघाला असला तरी काही अधिकारी आणि कर्मचारी मात्र नियमित कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. त्यांना याबाबत विचारले असता, कामाचा ताण जास्त असल्यामुळे मैदानापेक्षा आपण कार्यालयीन काम पूर्ण करण्यालाच प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक सततच्या कामाच्या ताणातून बाहेर पडून थोडा विरंगुळा व्हावा यासाठीच हा क्रीडा व कला महोत्सव असल्याचे सीईओ आयुषी सिंह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र कार्यालयाला पूर्णपणे सुटी नसल्यामुळे कामे उरकण्याकडे काही कर्मचाऱ्यांचा कल दिसून आला.

दरम्यान जिल्हास्तरावर विविध खेळांमध्ये बाजी मारण्यासाठी ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. खो-खो, कबड्डीसारख्या खेळात दिसणारी विद्यार्थ्यांची चपळाई आणि कौशल्य पाहून या विद्यार्थ्यांना संधी मिळाल्यास ते राज्य आणि देशपातळीवरही चमक दाखवू शकतात, अशा प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी आणि शिक्षकांकडून व्यक्त होत आहेत.

शनिवारी (दि.१०) सर्व क्रीडा स्पर्धांच्या अंतिम लढती होणार असून संध्याकाळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यासाठी सर्वांची जोमाने तयारी सुरू आहे.