पोलिस दादांच्या भेटवस्तूंनी हरखून गेल्या अतिसंवेदनशील कोर्ला गावातील भगिनी

पातागुडम पोलिसांनी दिली रक्षाबंधनाची भेट

गडचिरोली : मोजक्या मिळकतीत हलाकीच्या परिस्थितीत राहणाऱ्या दुर्गम भागातील महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस दादांनी राख्या बांधून घेत त्यांना विविध भेटवस्तू, जीवनावश्यक साहित्य आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. यामुळे कोर्ला गावातील या महिलांसह विद्यार्थी हरखून गेले होते.

पातागुडम उपपोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिसंवेदनशील कोर्ला गावाला ग्रामभेट दिली. याचवेळी त्यांनी रक्षाबंधन साजरे केले. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड, पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांनी नक्सलविरोधी अभियानादरम्यान अतिसंवेदनशील कोर्ला गावाला गावाला ग्रामभेट दिली. यावेळी गावातील 70 ते 80 नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी गावातील महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना ओवाळणी म्हणून साड्यांचे वाटप, लहान मुलामुलींना दप्तर, तसेच शालेय साहित्याचे वाटप, पुरुषांना लुंगी वाटप आणि विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अतिसंवेदनशिल कोर्ला हे गाव इंद्रावती नदी किनारी असून लोकसंख्या 450 ते 500 च्या दरम्यान आहे. पातागुडमपासून सुमारे 9 किमी अंतरावर आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामभेटीदरम्यान ग्रामस्थांना पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना व प्रशिक्षणांबाबत माहिती देण्यात आली. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिस दल नेहमीच प्रयत्नशील राहील असे पीएसआय तुतूरवाड यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या अंमलदारांसह राज्य राखीव दलाचे अंमलदार उपस्थित होते.