आदिवासींची श्रम, सहकार्यावर आधारित मूल्य जोपासणारी संस्कृती जपा- प्रा.भुक्या

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : आदिवासींमध्ये मानवी मुल्यांचा मोठा साठा आहे. आदिवासींच्या बोलीभाषा, त्या भाषांना असणारी लिपी, त्यांची गाणी, संस्कृती, पेहराव, ते इतर समुदायापेक्षा कसे वेगळे आहेत याचा अभ्यास अध्यासन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करता येईल. आदिवासींची श्रम समूह आणि सहकार्यावर आधारित मूल्य जोपासणारी मानवी संस्कृती जपली पाहिजे. आदिवासींचे अधिकार, कायदे, जमिनीचे अधिकार, सांस्कृतिक वारसा जतन करणे यावर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा वारसा रूजवावा, असे प्रतिपादन आदिवासींचे अभ्यासक, हैदराबादच्या केंद्रीय विद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.भांग्या भुक्या यांनी शुक्रवारी गोंडवाना विद्यापीठात केले.

विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक देवाजी तोफा, तसेच प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन तसेच आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरु डॉ.बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात आदिवासींच्या संदर्भात जे काम होत होते, त्याला एक नवीन आयाम मिळालेला आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये ज्या प्रकारची संस्कृती आहे ती विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येईल, येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचवता येईल हाच आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक अध्यासन केंद्रासाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हे अध्यासन केंद्र या परीक्षेत्रातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले.

या अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.श्याम कोरेटी, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गणमान्य नागरिक, समाजसेवक, सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य , विद्यापीठातील सर्व शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.वैभव मसराम, तर संचालन ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ.रजनी वाढई यांनी केले.