पोलिसांच्या पुढाकाराने 40 युवतींची नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणासाठी निवड

गडचिरोली पोलीस दलाच्या 'प्रोजेक्ट उडान'अंतर्गत रोजगार मेळावा

गडचिरोली : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शनिवार, दि. 10 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी 40 महिला उमेदवारांची नर्सिंग असिस्टंट या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉलमध्ये आयोजित या रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.या मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 70 बेरोजगार युवतींनी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते. त्यांच्यापैकी 40 उमेदवारांची निवड पार्कसन्स स्किल सेंटर, नागपूर यांच्याकडून करण्यात आली.
प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी कौतुक करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर आहे. सन 2023 या वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाकडून दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना 10 हजार नवीन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत माहिती देऊन त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदारांनी परिश्रम घेतले.