गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या ‘मोदी @ 9’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे व्यापारी संमेलन गडचिरोलीतील हॉटेल लँडमार्क मध्ये शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात झाले. यावेळी विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मध्यप्रदेशचे सहकार आणि सार्वजनिक सेवा व्यवस्थापन मंत्री डॅा.अरविंदसिंह भदौरिया यांनी भाजप सरकार व्यापाऱ्यांच्या सर्वांगिन हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या अडचणी शासन स्तरावरून दूर करण्याचे आश्वासन दिले. गेल्या ९ वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
यावेळी गुजरातमधील राज्यसभा खासदार रामजीभाई मौकरिया, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, वर्धेचे खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली चिमूर लोकसभेचे निवडणूक प्रमुख किशन नागदेवे,आमदार कृष्णा गजबे ,आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, एसटी मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, धर्मपाल मेश्राम, जिल्हा महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री तथा गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे , जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.डॉ. भदौरिया म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कार्यकाळात प्रामुख्याने देशातील व्यापारी, उद्योजक यांच्या हितासाठी महत्वाचे निर्णय घेतले. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक यांच्या हितासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात चामोर्शी येथील व्यापारी हरीश गांधी, गजानन भांडेकर , गडचिरोली येथील व्यापारी हेमंत राठी यांनी ना.डॉ. भदौरिया यांचा सत्कार केला. या संमेलनाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातल्या २० तालुक्यातील व्यापारी, प्रतिष्ठित उद्योजक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी तर आभार जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी मानले.
संमेलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ना.भदौरिया यांनी केंद्र सरकारच्या ९ वर्षात झालेल्या अभूतपूर्व कामांची माहिती दिली. यापूर्वी न झालेली अनेक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून त्यात आधारे जनता आम्हाला पुन्हा कौल देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.