गडचिरोली : जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील सोडे या गावच्या शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत बुधवारी 106 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनेनंतर गुरूवारी (आज) सकाळच्या नास्त्यानंतर पुन्हा 30 मुलींना मळमळ, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही मुलींना पुढील उपचारासाठी गडचिरोलीत हलविण्यात आले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराबाबा आत्राम यांनी आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा आढावा घेऊन अन्न सुरक्षेच्या नियमांमधील हलगय खपवून न घेण्याच्या सूचना केल्या.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत बारावीपर्यंतच्या मुली आहेत. त्यातील चौथी ते बारावीपर्यंतच्या १०६ मुलींना बुधवारी सकाळच्या जेवणानंतर एक ते दीड तासाने मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून 40 विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते.
गुरुवारी (दि.२१) सकाळी नाश्त्यात वाटाण्याचे उसळ खाल्ल्यानंतर पुन्हा 30 मुलींना तोच त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून काही मुलींना दुपारी तर काहींना संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलींच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांना अन्नातून विषबाधा होण्याचा हा प्रकार नेमका कसा घडला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
दरम्यान गुरूवारी सकाळी गडचिरोलीतील अन्न सुरक्षा अधिकारी एस.पी.तोरेम यांच्यासह त्यांच्या सहायक कर्मचाऱ्यांच्या चमुने सोडे येथे पोहोचून आश्रमशाळेतील खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यात मिरची, वटाणे, तेल, तूरदाळ, तांदूळ, हळद पावडर, सर्व मसाल्याचे पदार्थ, पोहे आदींचा समावेश होता. मात्र सकाळी केलेल्या नाश्त्याचे नमुने आरोग्य विभागाच्या चमुने आधीच घेऊन तपासणीसाठी पाठविले होते.
एफडीए मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून आढावा
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोलीतील आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा आढावा घेतला. योग्य पद्धतीने सर्व नमुने घेऊन तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अन्न सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर नियमानुसार कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.