ना.धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे पत्रातून आवाहन

आंदोलनकर्त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करा

गडचिरोली : गेल्या दोन वर्षात तीन वेळा नक्षलवाद्यांकडून धमकीवजा पत्र मिळालेल्या ना.धर्मरावबाबा आत्राम यांना उद्देशून २१ डिसेंबरला पुन्हा एकदा भाकपा (माओवादी)च्या पश्चिम सब झोनल ब्युरोकरून आवाहनवजा पत्रक काढण्यात आले. त्यात एटापल्ली तालुक्यातील दमकोंडवाही खाण सुरक्षा समितीच्या आंदोलनाच्या मंचावर जाऊन ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जिल्ह्यात कोणत्याही नवीन खाणी होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. परंतू राज्यात सत्तारूढ सरकारमध्ये सहभागी होताच त्यांना आपल्याच त्या भूमिकेचा विसर पडल्याचे सांगत नक्षल पत्रकातून ना.धर्मरावबाबा यांना त्यांचे आश्वासन पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वीही ना.आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकीवजा पत्रक मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान दमकोंडवाही येथे अनेक दिवस चाललेल्या खाणींविरोधी आंदोलनाला गेल्या उन्हाळ्यात ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन जिल्ह्यात नवीन खाणी मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. परंतू प्रत्यक्षात सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी या विषयावर मौन धारण केले असल्याचा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून न घेता नवीन पोलिस स्टेशनच्या उभारणीत ते मदत करत आहेत. त्यामुळे येत्या २४ डिसेंबरला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही आवाहन नक्षल पत्रकातून करण्यात आले आहे.