धानोरा : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतात. सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन धानोरा येथील जिल्हा परीषद हायस्कुलच्या सभागृहात 29 मे रोजी केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन धानोराचे तहसीलदार देवेंद्र वाडके यांच्या हस्ते झाले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी के.पी. कटरे, बिडीओ टिचकुले, विस्तार अधिकारी बारसागडे, अंगणवाडी सुपरवायझर, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणारी केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही योजना पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा, सुविधा देते. त्यात वैद्यकीय मदत, समुपदेशन, कायदेशीर सल्ला, पोलीस व निवास अशा सेवा व सुविधा देणारी ही एक महत्पपूर्ण योजना आहे. या योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ त्यांना मिळावा याकरीता योजनेची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सदर शिबिरात जनजागृती करण्यात आली. त्यासाठी माहितीपर जनजागृती करणारे स्टॉल लावुन महिला व नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली.
सखी वन स्टॉप सेंटर योजनेचे हे एक दिवसीय जनजागृती शिबिर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर तथा संरक्षण अधिकारी रुपाली काळे यांच्या मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोलीच्या केंद्र प्रशासक संगिता वरगंटीवार व समुपदेशक प्रणाली सुर्वे यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पडले. त्यासाठी धानोराचे संरक्षण अधिकारी एम.आर. करंगामी यांनी नियोजन केले होते.
महिला व बालकांसाठी हेल्पलाईन
आपल्या जवळपास पीडीत महिला व बालके आढळल्यास 181, 112, 1098, 1091, 155209 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरला संपर्क (07132-295675) करण्याचे आवाहन करण्यात आले. सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशा पीडीत महिला व बालके आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटरला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन नागरिकांनी दिले.