शेतात वीज नाही? मग घ्या ९० टक्के अनुदानावर सौर कृषीपंप

गडचिरोली जिल्ह्यात पीएम-कुसूम योजना ठरणार वरदान

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेतापर्यंत वीज पुरवठा झालेला नाही. त्यामुळे कृषीपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. मात्र आता सौर कृषीपंपाच्या माध्यमातून ही समस्या दूर होणार आहे. त्यासाठी सरकारकडून पीएम-कुसूम या योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्केपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्यातील केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (पीएम- कुसुम) या योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध होणार आहे. 3 एचपी क्षमता असलेल्या पंपाची किंमत 1 लाख 93 हजार 806 रुपये आहे. 5 एचपी क्षमता असलेल्या पंपाची किंमत 2 लाख 69 हजार 746 रुपये आहे. तसेच 7.5 एचपी क्षमता असलेल्या पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये आहे. यासाठी लाभार्थी हिस्सा सर्वसाधारण 10 टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी अवघा 5 टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे.

महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी दि.17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुनच अर्ज करावा, इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. गडचिरोली जिल्हयातून आत्तापर्यंत 54 अर्ज दाखल झाले आहेत. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 किंवा 35000457 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता, असे महासंचालक महाऊर्जा यांनी कळविले आहे.