गडचिरोली : विविध गुन्ह्यांत गडचिरोली पोलिसांना हव्या असलेल्या वरिष्ठ कॅडरच्या तीन जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.14) गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. त्यात एका नक्षल दाम्पत्याचा समावेश आहे. त्या तिघांवर मिळून 38 लाखांचे इनाम राज्य शासनाने ठेवले होते. विशेष म्हणजे नवीन वर्षातील अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत 20 जणांनी नक्षल चळवळीतून माघारी फिरत आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला आहे.
काल आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये डीव्हीसीएम (विभागीय समिती सदस्य) असलेल्या विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदीप सहागु तुलावी (40 वर्ष) रा.गुर्रेकसा, ता.धानोरा आणि नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडू ऊईके (55 वर्ष), रा.मेडपल्ली, ता.भामरागड, जि.गडचिरोली आणि सेक्शन कमांडर वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी (36 वर्ष), रा.गुर्रेकसा, ता.धानोरा यांचा समावेश आहे. यात विक्रम आणि नीलाबाई यांच्यावर प्रत्येकी 16 लाखांचे तर वसंती हिच्यावर 6 लाखांचे इनाम होते.
असा आहे आत्मसमर्पित नक्षलींचा कार्यकाळ
विक्रम ऊर्फ मंगलसिंग हा 2004 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. धानोरा दलममध्ये त्याने 2007 पर्यंत कमांडर पदावर काम केले. त्यानंतर माड मधील कुतुल एरियामध्ये वैद्यकिय कामकाजाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कंपनी क्र.4 मध्ये एसीएम / पीपीसीएम पदावर बदली होऊन सन 2010 पर्यंत नक्षलींसाठी डॉक्टर म्हणून काम केले. 2010 मध्ये कंपनी क्र.10 मध्ये उपकमांडर (सीवायपीसी) पदावर पदोन्नती होऊन सन 2012 पर्यंत काम केले. त्यानंतर कमांडर आणि सीआयपीसी पदावर काम केल्यानंतर सन 2015 ते 2017 पर्यंत डीके झोन डॉक्टर टिममध्ये डीव्हीसीएम, सन 2017 ते 2022 पर्यंत कंपनी क्र.1 मध्ये सीवायपीसी/कमांडर तसेच सचिव पदावर काम केले. सन 2022 पासून आतापर्यंत कंपनी क्र.10 मध्ये सीवायपीसी / डिव्हिसीएम / उप-कमांडर पदावर काम केले.
नीलाबाई उर्फ अनुसया बंडू उईके
नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडू उईके डिसेंबर 1988 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. 1991 मध्ये कोहलीबेडा दलम (उत्तर बस्तर डिव्हीजन (छ.ग.)) मध्ये बदली होऊन सन 1996 पर्यंत तिकडे काम केले. सन 1996 साली कोहलीबेडा दलममध्ये एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन 2002 पर्यंत काम केले. त्यानंतर माड डिव्हीजनमधील कोहकामेट्टा दलममध्ये, कोहकामेट्टा महिला दलममध्ये 2005 पर्यंत काम केले. सन 2005 पासून 2011 पर्यंत कुतूल-कोहकामेट्टा एरीया कमिटीमध्ये नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम केले. सन 2012 मध्ये डिव्हिसीएम पदावर पदोन्नती झाली. सन 2015 मध्ये मोपोस (मोबाईल पॉलीटीकल स्कुल) मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत काम केले. सन 2018 मध्ये ऊसेवाडा टेलर टिममध्ये बदली होऊन 2025 पर्यंत काम केले. जानेवारी 2025 मध्ये कुतूल एरीया कमिटीतील टेलर टिममध्ये डिव्हिसीएम पदावर आतापर्यंत काम केले.
वसंती उर्फ दुल्लो राजू हिडामी
वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी ही 2008 मध्ये गुर्रेकसा गावातील क्रांतीकारी आदिवासी महिला संघटनेमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2009 पर्यंत तिथे काम केले. मे 2009 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ऑक्टोबर 2009 पर्यंत काम केले. त्यानंतर कंपनी क्र.04 मध्ये, कंपनी क्र.10 मध्ये काम केल्यानंतर जानेवारी 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन काम केले. मार्च 2012 मध्ये माड डिव्हीजनमधील बटालियन क्र.2 मध्ये बदली झाली. 2015 मध्ये डिके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन सन 2017 पर्यंत काम केले. 2017 मध्ये डिके झोन टेलर टिममध्ये बदली होऊन 2023 पर्यंत सदस्य पदावर काम केले. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये कंपनी क्र.10 मध्ये बदली होऊन ऑक्टोबर 2024 पर्यंत काम केले. त्यानंतर पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सी-सेक्शन उपकमांडर म्हणून आजपावेतो काम केले.
दिड महिन्यात 20 जणांचे आत्मसमर्पण
जिल्ह्यात 2022 ते आतापर्यंत एकुण 53 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच 2025 साली आतापर्यंत 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 191 बटालियनचे कमांडंट सत्यप्रकाश आदींनी मार्गर्शन केले. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी ईच्छुक असतील, ज्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन हवे असेल, त्यांना गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन नीलोत्पल यांनी केले.