गडचिरोली : आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आणि सचिव विरेंद्र सिंग यांनी आपल्या उच्चस्तरीय चमुसह दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून आरोग्य यंत्रणेचा सखोल आढावा घेऊन निरीक्षण केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर मांडणी करण्यात येईल, असे आरोग्य सचिवांनी या निरीक्षणानंतर स्पष्ट केले.
सचिवांनी गडचिरोली येथे आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था ‘सर्च’ येथेही भेट देऊन संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव 15 दिवसांच्या वर प्रलंबित राहिल्यास तातडीने पाठपुरावा करण्याची सूचना सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत मंजूर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि निधीअभावी प्रलंबित राहिलेल्या योजनांसाठी त्वरित निधीची मागणी करण्याची आवश्यकता असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले. कारण या निधीचा उपयोग करण्यासाठी आता केवळ एक वर्ष शिल्लक राहिल्याने ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अधिकाधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यास प्राधान्य द्यावे, कोणत्याही रुग्णावर केवळ आयुष्मान कार्ड प्रलंबित असण्याच्या कारणामुळे उपचार थांबवले जाणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश सचिवांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबींचे दस्तऐवजीकरण करून, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्यात या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सचिवद्वयांसोबत सहसचिव अशोक आत्राम, सीईओ (SHAS) अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितिन अंबाडेकर, पुणे येथील सहसंचालक डॉ.कमलापुरकर आणि डॉ.सरिता हजारे, ब्लड बँकेचे डॉ.महेंद्र केंद्रे, एन.यू.एच.एम.च्या उपसंचालक डॉ.दिप्ती पाटील आणि डॉ.विनोद पहाळे, कुष्ठरोग सहसंचालक डॉ.संदीप सांगळे, हॉस्पिटल आणि प्रोक्योरमेंटच्या सहसंचालक डॉ.सुनिता गोल्हाईत तसेच सोनल गावंडे, डॉ.कैलास बाविस्कर आणि कक्ष अधिकारी नारायण डोळस ही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चमू दोन दिवसीय दौऱ्यात सहभागी होती.
आरोग्य उपकेंद्रांची संख्या वाढणार
सदर चमुने नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. प्रस्तावित इमारत बांधकाम, आवश्यक साधनसामग्री, तसेच प्राध्यापक आणि तांत्रिक मनुष्यबळ यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी जिल्ह्यात चार नवीन आरोग्य केंद्र मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले. तसेच नवीन आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करताना गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत लोकसंख्यानिहाय विचार न करता, आदिवासी दुर्गम व विस्तिर्ण क्षेत्राचा विचार करून विशेष उपकेंद्रांची निर्मिती व्हावी असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची सविस्तर माहिती सादर केली.