कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोलीत उत्स्फूर्त स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे अभिनंदन करताना खा.अशोक नेते आणि भाजप पदाधिकारी.

गडचिरोली : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होऊन कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवारी गडचिरोलीत आगमन झाले. नागपूरवरून गडचिरोलीपर्यंत त्यांचे विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतिषबाजी करून त्यांच्या कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

गडचिरोलीतील सर्किट हाऊसमध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास धर्मरावबाबांचे आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांच्यासह अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी ना.धर्मरावबाबा यांना शुभेच्छा दिल्या. प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनीही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुरात हलगेकर, युवा नेते लिलाधर भरडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने शासनाचे धोरण ठरविणाऱ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मला मिळेल. त्याचा या जिल्ह्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी धर्मराबाबा यांनी व्यक्त केला.