गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजप-सेना युती सरकारमध्ये सहभागी झालेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतलेले धर्मरावबाबा आत्राम यांना कोणते खाते मिळणार, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे येणार का, अशा प्रश्नांची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे. दरम्यान तूर्त खातेवाटपासाठी नवीन मंत्र्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पण धर्मरावबाबा यांना गडचिरोलीएेवजी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी तीन वेळा राज्यमंत्रीपदी राहिलेल्या धर्मरावबाबांनी यावेळी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तीन पक्षांच्या सरकारपैकी भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षातील मंत्रिपदासाठी ईच्छुकांना वर्षभरापासून ‘वेट अँड वॅाच’च्या भूमिकेत राहावे लागत असल्यामुळे नव्याने शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खात्यांचे वाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, धर्मरावबाबा यांनी आदिवासी विकास खाते मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या जिल्ह्यात खासदारांसह दोन आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यावर आपल्या पक्षाचे वर्चस्व ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहजपणे पालकमंत्रीपद सोडणार नाहीत. जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही तशी गळ त्यांना घातल्याचे समजते. त्यामुळे धर्मरावबाबांना गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व मिळण्याची शक्यता आहे. पुढील लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची ईच्छा पाहता जनसंपर्कासाठी ते सोयीचे होईल म्हणून धर्मरावबाबाही त्यासाठी तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आज होणार जिल्ह्यात आगमन
दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धर्मरावबाबा यांचे शुक्रवार दि.७ जुलै रोजी पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात आगमन होणार आहे. वाटेत ब्रह्मपुरी, वडसा, आरमोरी, पोर्ला येथे स्वागत स्वीकारत संध्याकाळी ४ च्या सुमारास ते गडचिरोलीत पोहोचण्याची शक्यता आहे.