सात गावातील नागरिकांनी दाखविला कोनसरी लोहप्रकल्पाला हिरवा कंदील

पर्यावरणविषयक जनसुनावणीत सुविधांच्या मागण्यांवर भर

जनसुनावणीला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले परिसरातील अनेक गावातील नागरिक.

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उभारल्या जात असलेल्या लॅायड्स मेटल्सच्या लोहप्रकल्पासंदर्भात शुक्रवारी (दि.७) प्रकल्पस्थळी पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी सदर प्रकल्पाने बाधित होणाऱ्या परिसरातील ७ गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनसुनावणीत सहभाग घेतला. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात किंवा होणाऱ्या पर्यावरणविषयक बाबींसंदर्भात कोणीही आक्षेप किंवा विरोध दर्शविला नाही. मात्र लॅायड्स मेटल्स कंपनीने सदर गावांमधील विविध समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळी ११ वाजता कोनसरी येथे सुरू झालेल्या या जनसुनावणीला जिल्हाधिकारी संजय मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाच्या अधिकारी हेमा देशपांडे, तसेच खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.दीपक आत्राम, लॅायड्स मेटल्सचे एमडी डी.प्रभाकरन यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी लॅायड्स मेटल्सच्या वतीने जनरल मॅनेजर (आॅपरेशन) जीवन हेडाऊ यांनी प्रास्ताविकातून या प्रकल्पाची माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने एक-एक जण समोर येऊन आपले म्हणणे मांडत होते. त्यात कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश दांडीकवार, सोमनपल्लीचे सरपंच निलकंठ निखाडे, तसेच सरपंच दीपाली सोयाम, सरपंच जितेंद्र उईके, भूमिधारक संजय पोत्राजवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व गावकऱ्यांनी आपापल्या अपेक्षा, सूचना आणि शंकाही मांडल्या. त्यावर जनरल मॅनेजर जीवन हेडाऊ यांनी उत्तर देऊन शंकांचे निरसन केले. तसेच कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, तर ज्या गोष्टी सरकारी यंत्रणेच्या कार्यकक्षेत येतात त्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली.

सर्वात शेवटी खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणल्याबद्दल कंपनीचे एमडी प्रभाकरन यांचे आभार व्यक्त केले. बेरोजगारांच्या हातांना काम देणाऱ्या अशा उद्योगांना आम्ही नेहमी सहकार्य करू, असा विश्वास दिला. माजी आ.दीपक आत्राम यांनीही प्रभाकरन हे दिलेला शब्द पाळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र सुरजागड खाणीतून निघणाऱ्या लाल पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तिथे फिल्टर प्लान्ट लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या संपूर्ण जनसुनावणीच्या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले.

नागरिकांनी व्यक्त केल्या या अपेक्षा
परिसरातील गावांमध्ये मोफत वीज, शुद्ध पाणी पुरवठा करावा. गावाला समृद्धी येण्यासाठी कंपनीचे मुख्यालय कोनसरी गावातच ठेवावे. यापुढे कंपनीला लागणारी जमीन वाढीव दराने घ्यावी. प्रकल्पातून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे, धुळीमुळे शेतकऱ्यांचे पीक, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, जास्तीत जास्त स्थानिक बेरोजगारांना नोकरी द्यावी, त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, गावांमधील आरोग्य, शिक्षण, रस्त्यांसारख्या सुविधा निर्माण कराव्यात, अशा अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या.

कंपनीने दिले हे आश्वासन
या प्रकल्पाची चिमणी ११० मिटर उंच राहणार आहे. त्यामुळे त्यातून निघणाऱ्या धुराचा दुष्परिणाम पिकांवर किंवा मानवी आरोग्यावर होणार नाही. प्रकल्पातून निघणारे दुषित पाणी नदीत सोडले जाणार नाही. त्याचा अंतर्गत वापर होईल. वैद्यकीय सोयीसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाईल. शिक्षकांची कमतरता, आयटीआय कॅालेजसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. पुढे लागणाऱ्या जमिनीचा मोबदला शासकीय नियमानुसारच दिला जाईल. प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाल्यानंतर कंपनीत रोजगार मिळालेल्यांचा पगारही वाढणार, असे अनेक आश्वासन यावेळी कंपनीच्या वतीने देण्यात आले.

जनसुनावणीच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना खा.अशोक नेते.