गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या आणि साहित्याच्या नुकसानीसाठी दिली जाणारी भरपाई अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एकरी एक लाख, तर मका उत्पादकांना एकरी दोन लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खासदार डॅा.नामदेव किरसान व काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
काँग्रेस पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. वाघ-हत्तींमुळे होणारे नुकसान आणि जीवित हाणी टाळण्यासाठी त्यांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने करत लक्ष वेधले. पण त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आले नाही. धानासाठी जाहीर केलेले हेक्टरी 20 हजारांचे बोनसही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे अनुदान दिले नाही. त्यामुळे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
पावसाळ्याच्या तोंडावर राज्य सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले. पण आता पावसाळ्याच्या तोंडावर घरकुलांचे बांधकाम होईल का, अशी शंका उपस्थित करत खा.किरसान यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी शेतजमीन घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रक्रिया करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गाच्या केवळ डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र या मार्गाचे पक्के बांधकाम का केले जात नाही, असा सवाल यावेळी खा.किरसान यांनी केला.
पत्रकार परिषदेला प्रभाकर वासेकर, विश्वजित कोवासे, निलेश राठोड, सतीश विधाते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.