गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथे अधिकाराचा दुरूपयोग करून, कायदेशिर प्रक्रिया न करता अतिक्रमण काढण्याचा आततायीपणा करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दुसरीकडे हा आततायीपणा अंगलट येत असल्याचे दिसताच सोनटक्के यांनी ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेत आम्ही अतिक्रमण काढले नाही, असे म्हटले.
डॅा.प्रमोद साळवे यांच्या वनहक्क पट्ट्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना आणि न्यायालयात याचिका दाखल असताना कुठलीही कायदेशिर प्रक्रिया पार न पडता चातगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने त्यांचे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी डॅा.साळवे यांच्या जमिनीवरील ताराचे कुंपन काढले. शिवाय जेसीबी लावून सुरक्षा भिंतही पाडली. एवढेच नाही तर झाडांची कत्तल करून झाडांना पाणी देण्यासाठी लावलेले ठिबक सिंचनचे पाईपही काढून नेल्याचा आरोप डॅा.साळवे यांनी केला आहे. या कारवाईसाठी ग्रामविकास अधिकारी रणजित राठोड आणि एका माजी जि.प.सदस्याला हाताशी धरून वनपाल परशुराम मोहुर्ले यांच्यामार्फत कट रचल्याचा आरोप डॅा.साळवे यांनी केला आहे.

जेसीबीच्या माध्यमातून संरक्षक भिंत तोडत असताना पोलीस,वनविभागाचे कर्मचारी व्हिडीओ चित्रीकरणात, फोटोत दिसतात. मात्र आरएफओ सोनटक्के यांनी संरक्षक भिंत पाडल्याचा इन्कार करत सावध भूमिका घेऊन आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या मनमानी कारवाईविरोधात डॅा.साळवे यांनी न्यायालयाकडे धाव घेतल्यानंतर न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.