चंद्रपूर : आजच्या स्पर्धेच्या काळात सर्वजण धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे. आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, असे मार्गदर्शन खासदार अशोक नेते यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे आयोजित मोफत रोगनिदान, शस्रक्रिया आणि चष्मे वाटप महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमात मंचावर वर्धेचे खासदार रामदास तडस, गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे, वर्धेच्या सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयाचे संचालक अभ्युदय मेघे,अनिल गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक देवराव भोंगाडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक परदेशी, गडचिरोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि आयोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा.नेते पुढे म्हणाले, आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया एवढ्या महागड्या आहेत की त्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. हा खर्च आणि वेळ वाचण्यासाठीच या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे व्रत जोपासणारे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप शिबिराचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यामुळे असंख्य नागरिकांचे आशीर्वाद त्यांना मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.