सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील बांबू कटाईची चौकशी सुरू

दोन आमदारांच्या उपस्थितीत समितीची बैठक

वनसंरक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत चर्चा करताना आमदारद्वयांसह अधिकारीगण.

गडचिरोली : विधानसभेत घोषित केल्याप्रमाणे सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील अतिरिक्त बांबूची मोठ्या प्रमाणात कटाई केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे बैठक सोमवारी (दि.३१) गडचिरोलीतील वनसंरक्षक कार्यालयात झाली. डॅा.देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहअध्यक्ष म्हणून आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, तसेच जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, वनसंरक्षक (प्रादेशिक) रमेशकुमार, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिष शर्मा, आलापल्लीचे उपवनसंरक्षक शैलेश मिना, विभागीय वनअधिकारी (दक्षता) तसेच एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सामूहिक वनहक्क व पेसाअंतर्गत प्राप्त अधिकारानुसार बांबू कटाई करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा सुचविणे, सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील वनक्षेत्रात बांबूच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या कापणीबाबतच्या प्रकरणांची चौकशी करणे, बांबू रोपवन कार्यक्रमात सुधारणा करणे, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन योजना तयार करणे, अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.