तुमच्या पिकांचा विमा काढला नाही? मिळाली तीन दिवसांची मुदतवाढ

केवळ एक रुपया भरून करा नोंदणी

गडचिरोली : राज्यात २०१६ पासून राबविल्या जात असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन स्वरूपात आणण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ ते २०२५-२६ अशा तीन वर्षांसाठी असलेल्या या विम्यासाठी केवळ १ रुपयात नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत असलेली मुदत संपली असली तरी त्यासाठी आणखी तीन दिवस मुदतवाढ देऊन ३ आॅगस्टपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
आहे. सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतक-यांना प्रतिअर्ज केवळ १ रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. या विमा कंपनीकडे काम देण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट आली असेल तर विमा संरक्षण देय राहणार आहे. तसेच दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या उत्पादनातील घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते.

गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. पिकांच्या काढणीनंतर शेतात पिक कापणी करून पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी /काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे काढणीनंतर २ आठवड्याच्या आत गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहुन नुकसानभरपाई निश्चित केली जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कळविले.