अतिदुर्गम फुलणारमध्ये प्रथमच झाले आरोग्य तपासणी शिबिर

गडचिरोली पोलिसांचा पुढाकार

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथील पोलीस मदत केंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात अतिदुर्गम कोपर्शी, फुलणार, गुंडूरवाही, पोयरकोठी व आसपासच्या अतिदुर्गम गावांतील एकूण 210 नागरिक व विद्यार्थ्यांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.

पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहोचावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून नवनिर्मित पोमकें फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथे दि.21 फेब्रुवारीला हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी, जिल्हा सामान्य रुग्नालयाचे डॉ.विरेंद्र भावे (फिजीशियन), डॉ.शारदा ठाकरे (स्रीरोगतज्ज्ञ), डॉ.देवश्री होळी (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ.समीर बनसोडे (बालरोगतज्ज्ञ), राकेश चांदेकर, शिल्पा चांदेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

विविध आजारांबाबत तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मेळाव्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतज्ञांव्दारे तपासणी करून आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी एकूण 28 नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस करण्यात आली.

बालरोग तज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ञांकडून महिलांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 179 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण 40 हजार 265 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.