Home क्राईम दारूच्या नशेत तरुण मुलाने केली जन्मदात्या वडिलाची निर्घृण हत्या

दारूच्या नशेत तरुण मुलाने केली जन्मदात्या वडिलाची निर्घृण हत्या

पुराडा ठाण्यांतर्गत चारभट्टीची घटना

कुरखेडा : दारूची नशा भल्याभल्यांची मती गुंग करून टाकते. त्याचाच प्रत्यय देणारी घटना गुरूवारच्या रात्री कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलिसांच्या हद्दीतील चारभट्टी या गावात घडली. एका तरुण मुलाने दारूच्या नशेत जन्मदात्या वडिलांच्या डोक्यावर जळत्या लाकडाचा प्रहार करून त्यांची हत्या केली. त्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चारभट्टीच्या बिरसा नगरमध्ये मनोहर निरंगशहा गोटा (51 वर्ष), त्यांचा मुलगा नागेश (29) आणि इतर लोक संध्याकाळी थंडीमुळे घरातील अंगणात शेकोटी पेटवून जेवायला बसले होते. यावेळी त्या बापलेकात पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद शब्दागणिक वाढत गेला आणि दारूच्या नशेत असलेल्या नागेशने रागाच्या भरात जळत्या शेकोटीमधील लाकूड उचलून पित्याच्या डोक्यावर प्रहार केला. या जोरदार प्रहाराने मनोहर गोटा यांच्या मेंदूला जबर इजा झाली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

पुराडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून आरोपी मुलाला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.