देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात वडसा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांत छत्तीसगड राज्यातून स्थलांतरित झालेल्या जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून शेतपिकांचे, शेतीच्या अवजारांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही बाब आमदार कृष्णा गजबे यांनी सभागृगहात मांडताच तातडीने हालचाली झाल्या. नुकसानग्रस्तांना अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना प्राधिकृत केले. आ.गजबे यांनी मुंबईवरून परतताच थेट नुकसानग्रस्त भागात जाऊन संबंधितांना धनादेशांचे वाटप केले.
यावर्षी २०२३-२४ मध्ये २१ जुलै २०२३ रोजी अंदाजे २२-२३ जंगली हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यातील गोठणगावमार्गे कुरखेडा परिक्षेत्रातील चारभट्टी, पिंटेसुर बिटमध्ये दाखल झाला होता. सदर क्षेत्रात जंगली हत्तींनी अंदाजे ३० शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान केले. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोका पंचनामा करून शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याची कारवाई करण्यात आली असतानाच सदर कळपाने २२ जुलै रोजी पुराडा वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र हिडकिकन्हार गावात दाखल होऊन २५ जुलैपर्यंत व त्यानंतर २६ पासून ३१ जुलैपर्यंत कोहका, दादापूर परिक्षेत्रात वास्तव्य करून १ ऑगस्ट रोजी आंबेझरी गावातील १४ घरांचे नुकसान केले.
पंचनाम्यानुसार पुराडा परिक्षेत्रातील १४ घरांच्या नुकसानीचे ७ लाख, १३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी १८.२० लाख, कुरखेडा परिक्षेत्रातील ३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी ४.२० लाख तसेच देलनवाडी परिक्षेत्रातील ८ शेतकऱ्यांच्या शेतपिक नुकसानीपोटी १.१२ लाख असा एकूण १८२ नुकसानग्रस्तांना ३०.५२ राख रुपयांचा मदतनिधी आमदार गजबे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
यावेळी यावेळी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, कुरखेडा शहराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक व तालुका महामंञी ॲड.उमशे वालदे, केशव गुरूनुले, तालुका महामंत्री उल्हास देशमुख, डॅा.मनोहर आत्राम, बाजार समिती संचालक रेमाजी किरणापुरे, सोनपूरचे सरपंच दादाजी हलामी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हान, वनक्षेत्रपाल दिघोरे व गावातील नागरिक उपस्थित होते.