गडचिरोली : रेगडी जलाशयाच्या फुटलेल्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करून ९ ऑगस्ट रोजी जलपूजनाचा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्या, असे निर्देश आमदार डॅा.देवराव होळी यांनी रेगडी कन्नमवार जलाशयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, नियोजन अधिकारी गडचिरोली, चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, चामोर्शी तालुका कृषी अधिकारी, तसेच भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, काशिनाथ बुरांडे, राजू धोडरे, प्रतीक राठी , सुमित्रा सातपुते, बाबुराव धोंगडे तथा शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सद्यस्थितीत रोवणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये रेगडी कन्नमवार जलाशयाच्या फुटलेल्या मुख्य कालव्याचे काम तातडीने करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता जेसीबी, पोकलेन व आवश्यक त्या संसाधनांचा उपयोग करून पुढील २४ तासाच्या आत मुख्य कॅनल दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.