गडचिरोली : जिल्ह्यातील नागरी विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी आरमोरी व वडसा (देसाईगंज) शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही विकास कामे लोकाभिमुख पद्धतीने, गुणवत्तेला प्राधान्य देत आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
आरमोरी शहराच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी प्रितीश मगरे, नगराध्यक्ष रुपेश पुणेकर व नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात, तसेच तालुका क्रीडा संकुल परिसर विकसित करण्यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. नगर परिषद क्षेत्रातील महसूल विभागाच्या जागा विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे, तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे आणि गुणवत्तेशी तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देसाईगंज (वडसा) तालुक्यातील शिवराजपूर येथे जिल्हाधिकारी पंडा यांनी पांदण रस्त्याची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच रक्तदान शिबिराला भेट देत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. प्रभारी तहसीलदार एन.टी. कुमरे यावेळी उपस्थित होते.





























