Home दैनंदिन बातम्या संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात 41 महिलांसह 269 जणांचे रक्तदान

संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात 41 महिलांसह 269 जणांचे रक्तदान

जिल्हाधिकाऱ्यांनीही दिली भेट

देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी (दि.24) येथील संत निरंकारी सत्संग भवनात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 269 युनिट रक्तसंकलन झाले. या रक्तदासाठी 240 पुरूष आणि 83 महिला अशा एकूण 323 जणांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 पुरूष आणि 42 महिला अपात्र झाल्यामुळे त्यांना ईच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. मात्र 228 पुरूष आणि 41 महिलांचे मिळून 269 युनिट रक्तदान झाले.

या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आणि संत निरंकारी मंडळाचे नागपूर झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी नगराध्यक्ष लता सुंदरकर, उपनगराध्यक्षव नरेश विठ्ठलानी, जेसा मोटवानी, विलास लोखंडे, नगरसेवक राहुल सतवानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

शिबिराला दुपारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते काही रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. रक्तदान हे निष्काम आणि महान सेवाकार्य आहे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी मागील 17 वर्षापासून संत निरंकारी मंडळाची देसाईगंज (वडसा) शाखा अविरतपणे हे कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी संत निरंकारी मंडळाच्या शाखेचे कौतुक केले. त्यांच्यासोबत उपविभागिय अधिकारी प्रसेन्नजीत प्रधान, माजी आमदार कृष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा, उपनगराध्यक्ष नरेश विठ्ठलानी, सभापती पिंकू बावने, सचिन खरकाटे, भाविका साधवानी, राहुल सतवानी इ. उपस्थित होते.

रक्तदानातून सद्गुरूंना श्रद्धांजली

संत निरंकारी मंडळाद्वारे 24 एप्रिलला सद्गुरू बाबा गुरबचनसिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्वांजली देण्यासाठी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करून श्रद्वांजली दिली जाते. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तटंचाई निर्माण झाल्यामुळे या मंडळाला रक्तदान शिबिर घेण्याची विनंती करताच मंडळाद्वारे मानवसेवेसाठी तातडीने शिबिराचे आयोजन केल्याचे किशन नागदेवे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले. आजपर्यत संत निरकारी मंडळाने देशभरात 13 लक्षपेक्षा जास्त युनिट रक्तदान केल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या टिमचे सहकार्य

रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रूगणालय, गडचिरोली येथील रक्तपेढीचे डॉ.मुकूंद दाभाडे, डॉ.नागेश्वर शाहु, डॉ.प्रणय कोसे, अजय ठाकरे, गणेश साळवे, समता खोब्रागडे, रिना गणवीर, तसेच रक्तपेढी भंडारा येथील डॉ.अदिती पांडे, राज नागदेवे, सना शेख यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण रूग्णालय वडसाच्या चमुने रक्त तपासणी केली. या शिबिरासाठी सेवादलाच्या सर्व स्त्री-पुरूष सदस्यांनी गणवेशात उपस्थित राहून सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सेवादलाचे संचालक नानकराम कुकरेजा यांनी तर आभार प्रदर्शन पुरूषोत्तम डेंगानी यांनी केले.