गडचिरोली : राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याबाबतचा आदेश राज्य सहकारी पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाला दिला आहे. आमदार डॉ.परिणय फुके यांनी याबाबत अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किमान आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदीचे उद्दिष्ट यावर्षी कमी केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने कमी किमतीत आपला धान व्यापाऱ्यांना विकला. आता उशिरा का होईना, सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार डॉ.फुके यांनी धान खरेदीचे उद्दिष्ट 50 लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत मे महिन्यात पत्र देऊन चर्चा केली होती. याशिवाय केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. केंद्र सरकार व अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र सरकारने धान खरेदीच्या अतिरिक्त उद्दिष्टसाठी राज्य सरकारला परवानगी दिली. त्यानुसार अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना 2025-26 वर्षातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत धान खरेदीचे उद्दिष्ट 2 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवून दिले आहे. त्यानुसार धान खरेदी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.
































