Home पब्लिक प्रॉब्लेम कृत्रिम एमआरपी वाढीविरोधात ग्राहक पंचायत आज धरणे देणार

कृत्रिम एमआरपी वाढीविरोधात ग्राहक पंचायत आज धरणे देणार

एसआरपी प्रणाली लागू करा

गडचिरोली : दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, बियाणे, कीटकनाशके, तसेच कृषी निविष्ठांवर कृत्रिमरीत्या वाढविण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमतीमुळे (MRP) ग्राहक व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली यांच्या वतीने आज 12 जून रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनानंतर केंद्र सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.

उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि वाजवी नफा यावर आधारित एसआरपी (Suggested Retail Price) प्रणाली लागू करावी, उत्पादन खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, QR कोडच्या माध्यमातून किंमत पारदर्शकता आणावी, तसेच भ्रामक सवलती आणि अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

याशिवाय MRP सुधारणा व किंमत नियंत्रणासंदर्भातील अभ्यास समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणीही करण्यात येणार आहे. ग्राहक, शेतकरी व रुग्णांचे आर्थिक हित जपण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

दिल्ली येथील जंतर-मंतरवर आज राष्ट्रीय स्तरावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने देशभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयांवरही आंदोलन करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे सकाळी 10 वाजता कारगिल चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे.