गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली औषधी, साहित्यांची खरेदी तिप्पट दराने करण्यात आली असून या २०० कोटींच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या खरेदीसंदर्भात आपण सविस्तर माहिती मागितली असून त्यासंदर्भातील चौकशीही लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ना.वडेट्टीवार यांनी राज्यासोबत जिल्ह्यातील विविध विषयांना हात घातला. गडचिरोली ही माझी होमपीच आहे. या पीचवर कसोटी सामना खेळता येत नसला तरी २०-२० खेळणार असल्याचे ते म्हणाले. एकाच पक्षातून दुसऱ्यांदा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होणारे आपण पहिलेच व्यक्ती ठरलो असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खराब झालेल्या अनेक मार्गांचे त्यांनी वाभाडे काढले. तसेच सिंचन प्रकल्पांचे काम नियोजनानुसार केले जात नसल्याची टिका केली. जिल्ह्यातील खनिज संपत्ती काढण्यासाठी जुन्या कायद्यात सरकारने बदल केला. जर त्यासाठी जंगल मोकळे होणार असेल तर जिल्ह्यात वनकायद्यामुळे रखडलेल्या कारवाफा, तुलतुली आणि चेन्ना या सिंचन प्रकल्पांनाही मार्गी लावावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.