मर्दीनटोला चकमकीतील ३३ विरांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक जाहीर

वर्षभरात ६२ अधिकारी, अंमलदार मानकरी

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशभरातील २२९ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणाऱ्या ५ पोलीस अधिकारी आणि २८ अंमलदारांसह एकूण ३३ जणांचा समावेश आहे.

१३ नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दीनटोला येथे झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले होते. मोस्ट वाँटेड जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही त्यात समावेश होता. त्यामुळे या विशेष कामगिरीची दखल घेऊन सदर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, अर्थात २५ जानेवारी २०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक प्राप्त झाले होते. आता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३३ जणांना शौर्यपदक जाहीर झाले. त्यामुळे एकाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ६२ पोलीस अधिकारी तथा अंमलदारांना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त होण्याचा बहुमान मिळाला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ही बाब महाराष्ट्र पोलीस दलासह गडचिरोली पोलिसांसाठी अभिमानाची असल्याचे सांगत शौर्यपदक प्राप्त झालेल्यांचे अभिनंदन केले.

हे ठरले शौर्यपदकाचे मानकरी

सहायक पोलिस निरीक्षक रोहीत फारणे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा काटे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील या अधिकाऱ्यांसह सहायक फौजदार सुरपत बड्डे , सहायक फौजदार मसरु कोरेटी, हवालदार द्रुगसाय नरोटे, हवालदार संजय वाचामी, हवालदार गौतम कांबळे, हवालदार मोरेश्वर पुराम, हवालदार मुकेश उसेंडी, नायक विनोद डोकरमारे, नायक कमलाकर घोडाम, नायक देवीदास हलामी, नायक महारु कुळमेथे, नायक चंद्रकांत ऊईके, नायक पोदा आत्राम, नायक किरण हिचामी, नायक दयाराम वाळवे, याशिवाय अंमलदार प्रवीण झोडे, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडाप, वारलु आत्राम, माधव तिम्मा, नरेश सिडाम, रोहिदास कुसनाके, नितेश दाणे, कैलास कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार, मुकुंद राठोड, नागेश पाल यांचा यात समावेश आहे.