Home दैनंदिन बातम्या ‘नशामुक्त युवा भारत’ अभियान, जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन

‘नशामुक्त युवा भारत’ अभियान, जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन

युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “नशामुक्त युवा विकसित भारत” या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन 30 जुलै रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित महिला महाविद्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

महिला महाविद्यालय, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि माय भारत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, तसेच कला, संस्कृती, साहित्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वाच्या माध्यमातून “नशामुक्त युवा विकसित भारत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या स्पर्धेत 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धांमध्ये लोकगीत, समूह नृत्य, पथनाट्य / मुक्तनाट्य, चित्रकला, वक्तृत्व, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन, तसेच स्लॅम पोएट्री (काव्य सादरीकरण) अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.

विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 28 जुलैपर्यंत MY Bharat Portal वर नोंदणी करून सहभाग निश्चित करावा. तसेच महाविद्यालयांनी आपल्या पात्र विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.योगेश पाटील, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य प्रा.डॉ.रूपेंद्रकुमार गौर, तसेच माय भारत केंद्राचे अधिकारी सारंग मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.