Home दैनंदिन बातम्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे

विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे

शिक्षकांचा सत्कार, डॅा.मडावी यांची अपेक्षा

गडचिरोली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असून त्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे आपले ध्येय असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळा, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा, तसेच दिव्यांग शाळांमधील शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मडावी, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.दिलीप बारसागडे उपस्थित होते.

डॉ.मडावी म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध संधींची ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास, ज्ञान आणि कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यापुरते मर्यादित न राहता बदलत्या काळातील आव्हानांसाठी त्यांना तयार करून राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील संधींपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी.

यावेळी शिक्षकांची समाजनिर्मितीमधील भूमिका, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षणाच्या माध्यमातून संविधानिक मूल्ये रुजविण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करून शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचेही नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात शिक्षकांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. प्रत्येक शिक्षकाला भारतीय संविधानाची प्रत आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

यावेळी राहुल गोविंदलवार, नीलेश तोरे, सचिन मांढरे, अमित खोब्रागडे, विष्णू घुबे, गजानन कामडी, प्रियंका डांगेवार, धर्मेंद्र अंबिलकर, अमर निखाडे, सोहेल शेख, रोहित वाकुडकर, विशाल झाडे, आरती अंबे, रमेश पोट्टे यांच्यासह शिक्षक व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.