कुरखेडा : पंचायत समिती कुरखेडा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी कुरखेडा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणाला माजी आमदार कृष्णा गजबे यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी मा.आ.गजबे यांनी उपोषणकर्ते सरपंच व प्रशासकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्यांची सविस्तर माहिती घेतली. सरपंच संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून मंत्रालयापर्यंत जाऊन संबंधितांची भेट घेऊन दाद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे यांच्या कार्यप्रणालीबाबत सरपंच संघटनेने गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यांच्या निलंबनाच्या मागणीवर संघटना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख, राकेश खुणे, चक्रधर नाकाडे यांच्यासह कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार गजबे यांच्या भेटीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याचे सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
































