चामोर्शी : उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावरील, ‘विदर्भाची काशी’ म्हणून सर्वदूर परिचित प्राचीन मार्कंडेश्वर देवस्थानचा परिसर श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी (दि.7) भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने न्हाऊन निघाला. संध्याकाळी हजारो भाविक नदीतीरावर झालेल्या ‘महागंगा पूजा आणि महाआरती’ सोहळ्याचे साक्षीदार झाले.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या विशेष पुढाकाराने या अभिनव धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभूतपूर्व उत्साहात झालेला हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
मंत्रोच्चार आणि शंखनादाने परिसर न्हाऊन निघाला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी परिवारासह मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मार्कंडेश्वर ऋषी देवाची विधिवत पूजाअर्चा व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात, ‘ॐ नमः शिवाय’ व महामृत्युंजय मंत्राच्या पठणाने वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली.
शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात नदीच्या पात्रासमोर दीपप्रज्वलन करून विधिवत गंगापूजन व महाआरती पार पडली. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने आणि महाआरतीने वैनगंगेचा पावन तीर उजळून निघाला होता.
आध्यात्मिक वैभवात पडली भर- डॅा.नेते
या पावनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले, “आज मार्कंडेश्वर ऋषींचे विधिवत दर्शन व पूजा-अर्चा करण्याचे भाग्य मला लाभले. वैनगंगेच्या पावन तीरावर अशा प्रकारे भव्य गंगा महापूजा पार पडत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक आणि दिव्य सोहळा साकार होत आहे; त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या धार्मिक उपक्रमामुळे आपल्या भागाचे आध्यात्मिक वैभव आणखी समृद्ध झाले आहे.”
या ऐतिहासिक महागंगा पूजा-आरती सोहळ्यास प्रामुख्याने भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जेष्ठ नेते डॉ.भारत खटी, भाजपा तालुका अध्यक्ष रोशनी वरघंटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, मार्कंडेश्वर समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, संजय बारापात्रे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, केशव निंबोड, शेषराव कोहळे, विशाल मांडवे तसेच मुरलीधर महाराज, अन्य महाराज आणि परिसरातील साधू-संत आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवभक्तांना महाप्रसाद वितरण
श्रावणाच्या या पावन पर्वावर वैनगंगेच्या तीरावर पार पडलेल्या या महागंगा आरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. या उपक्रमामुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले. वैनगंगा नदीच्या पात्राला नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे. आरतीच्या सांगता सोहळ्यानंतर उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
































